शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित मुख्याध्यापिकेशी गैरवर्तन;महिला आयोगाच्या दणक्यानंतर कारवाई educational
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुख्याध्यापिकेशी गैरवर्तन
केल्याप्रकरणी रत्नागिरी पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील याच्यावर जिल्हा परिषदेने कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. अखेर न्यायासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेने धावाधाव करून पाटील याची फेरचौकशी केली. त्यामध्ये दोषी आढळल्यानंतर जिल्हा परिषदेने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
विस्तार अधिकारी पाटील याच्याकडे रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळाचा प्रशासन अधिकारी पदाचा चार्ज होता. विस्तार अधिकारी पाटील याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, केळ्ये येथे सप्टेंबर २०२४ मध्ये भेट दिली होती. त्यावेळी तेथील मुख्याध्यापिकेशी बोलताना गैरशब्दाचा वापर केला होता. याबाबत त्या मुख्याध्यापिकेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि शिक्षणाधिकारी कासार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर चौकशी अधिकारी गटशिक्षणाधिकारी
प्रेरणा शिंदे यांनी चौकशी केली होती. त्याबाबतचा सविस्तर अहवाल शिंदे यांनी जिल्हा परिषदेला सादर केला होता. तरीही जिल्हा परिषदेने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्याकडे मुख्याध्यापिकेने या प्रकरणी तक्रार केली होती. चाकणकर यांनी आठवडाभरात कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या आदेश जिल्हा परिषदेला दिले होते.
या आदेशानंतर जिल्हा परिषदेने धावपळ करून माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, विस्तार अधिकारी पाटील दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले.
नगर परिषदेच्या शिक्षिकेची तक्रार
विस्तार अधिकारी सुनील पाटील याच्याविरोधात नगर परिषदेच्या एका शिक्षिकेनेही तक्रार केली आहे. या शिक्षिकेला कार्यालयात बोलावून गैरवर्तणूक केल्याचा आरोप पाटील याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्या शिक्षिकेने पाटील याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पाटील याची चौकशी सुरु झाली आहे.