सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत; १ डिसेंबरला परीक्षा ctet exam timetable
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबर २०२४ साठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) संकेतस्थळावर ‘सीटीईटी डिसेंबर २०२४’चे आयोजन करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘सीबीएसई’ मार्फत रविवार, दि. १ डिसेंबर २०२४ रोजी विसाव्या सीटीईटी परीक्षा पेपर १ आणि पेपर २ चे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास बुधवार, दि. १७ पासून सुरुवात झाली असून, उमेदवारांना येत्या १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही परीक्षा दोन सत्रांत सकाळी ९:३० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी २:३० ते ५ या कालावधीत होणार आहे. सर्वसाधारण आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी १ हजार, तर दोन्ही पेपरसाठी १ हजार २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
३० नोव्हेंबरला परीक्षा?
■ देशभरातील १३६ शहरांत २० भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येईल.
■ काही शहरांत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता असल्याने नियोजित तारखेच्या पूर्वी ३० नोव्हेंबर रोजीही परीक्षा आयोजन केले जाऊ शकते.
■ ऑनलाइन अर्ज करणे तसेच परीक्षेबाबत अधिक माहिती https://ctet.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.