सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत ashwasit pragati yojana
नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२/सह जिल्हा निबंधक वर्ग-२ या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत….
प्रस्तावनाः –
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून संदर्भ क्र.७ अन्वये प्राप्त नोंदणी व मुद्रांक विभागातील श्री. रमेश वामनराव पगार, यांना सह दुय्यम निबंधक वर्ग-२ या संवर्गात १० वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन आदेश :-
वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २ मार्च, २०१९ अन्वये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांना १०, २० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभांची – सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ” दिनांक ०१.०१.२०१६ पासून लागू करण्यात आली आहे.
सदर योजनेनुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२/सह जिल्हा निबंधक वर्ग-२ संवर्गातील अधिकाऱ्यांना (गट-ब वेतन श्रेणी ९३००-३४८०० ग्रेड पे ४४००) या पदावर सलग १० वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ (वेतनश्रेणी-९३००-३४८००, ग्रेड पे ५०००) मंजूर करण्यात येत आहे.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे संबंधित अधिका-यांच्या जबाबदारीत आणि कर्तव्यामध्ये वाढ होत नसली तरी त्यांना वित्त विभाग, शासन निर्णय दि. ०२.०३.२०१९ मधील तरतुदीच्या अधीन राहून नियमित पदोन्नतीप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेत वेतन निश्चितीचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन संरचना दिल्यानंतर वेतननिश्चिती नियमित पदोन्नतीप्रमाणे होईल. मात्र, त्याच वेतनसंरचनेत नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यानंतर पुन्हा वेतननिश्चितीचा लाभ देय होणार नाही.
२. प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ देय होणार नाही. या योजनेतंर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या वा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला लाभ काढून घेण्यात येईल. मात्र, दिलेल्या लाभाची वसूली करण्यात येणार नाही.
३ या आदेशान्वये कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक पीएवाय-१०८२/सीआर-११००/- (एक)/एसईआर-३, दि. ०६/११/१९८४ व वित्त विभाग, शासन परिपत्रक वेपूर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९, दि. २०/०२/२०१९ नुसार वेतन निश्चितीचा विकल्प द्यावयाचा असल्यास तो त्यांनी हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत देण्यात यावा.
४. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करुन त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक व वेतनसंरचेनुसार देण्यात यावा.
सदर शासन आदेश या विभागाची नस्ती क्रमांक आस्थाप-२०२२/१९२०/प्र.क्र.४२०/म-१ (धोरण) वर वित्त विभागाने अनौ. / संदर्भ क्रमांक ३६३/२२/सेवा-३, दि.२३/०८/२०२२ अन्वये दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०११४१७३३१७३८१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,